जम्मू -श्रीनगर महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू   

पर्यटकांच्या सोईसाठी निर्णय, दिल्लीकडे धावली विशेष रेल्वे 

जम्मू : जम्मू- श्रीनगर महामार्गावर बुधवारपासून एकेरी वाहतूक सुरू झाली. रामबन जिल्ह्यात नुकत्याच ढगफुटीनंतर मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्या होत्या. महामार्ग २७० किलोमीटर लांबीचा असून त्यापैकी चार किलोमीटरपर्यंत दरडीचे मोठ मोठे दगड कोसळले होते. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद झाली होती. काल अखेर तीन दिवसांनंतर एकमार्गी वाहतूक सुरू झाली. तसेच अडकलेल्या पर्यटकांच्या सोईसाठी कतरा ते नवी दिल्ली विशेष रेल्वे सोडली होती. 
 
जम्मू - श्रीनगर महामार्ग सर्व हवामानात वापरण्यायोग्य तयार केला आहे. तो काश्मीर खोर्‍याला देशाशी जोडणारा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. मात्र, दरडी कोसळल्यामुळे तो तीन दिवस बंद करण्यात आला होता. त्यामुळे दुतर्फा वाहने उभी होती. काश्मीरच्या दक्षिण अनंतनाग जिल्ह्यातील पर्यटनस्थळ पहलगाम येथे नुकताच दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर हजारोंच्या संख्येने पर्यटक काश्मीर सोडत आहेत. त्यांना घरी सुखरूप जाता यावे, यासाठी महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू केली आहे. काश्मीर खोर्‍यातून  पर्यटक माघारी जात असल्याची घटना हृदय पिळवटून टाकणारी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली. विमान वाहतूक मंत्रालय आणि महासंचालक यांनी अधिक विमानांची सेवा पर्यटकांना पुरवावी, असे आवाहनही त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये केले. 
 
महामार्गावर दुतर्फा वाहतूक पूर्ववत व्हावी, यासाठी दरडी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तशा सूचना दिल्या आहेत. तूर्त एकेरी मार्गाने वाहनांना जाण्यास परवानगी दिली. दरम्यान, मुसळधार पावसानंतर दरडीच्या मातीचे ढिगारे सरी ते मारोग दरम्यान सुमारे चार किलोमीटर महामार्गावर पसरले आहेत. त्याखाली सुमारे २० फूट खोलीवर अनेक वाहने दबली आहेत. सोमवारी अब्दुल्ला यांनी मार्गाची पाहणी करुन प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. 

Related Articles